Tuesday, 8 October 2019

कृतिशील सीमोल्लंघन

*चला करू या कृतिशील सीमोल्लंघन आपल्या विचारांचे*!

*सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा  !*

आज विजयादशमी !
वाईट विचार आणि आचाराला मूठमाती देत आपल्या चांगल्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी सीमोल्लंघन करण्याचा मुहूर्त !

समाजात काही महत्त्वाच्या समस्या आहेत. त्या समस्यांना आपल्या विचारसरणीत योग्य बदल आणून आपण सगळे मिळून नक्कीच सोडवू शकतो. अर्थातच कोणतीही गोष्ट इतरांनी करावी असे वाटत असेल तर त्याप्रमाणे आपण स्वतः कृती करायला हवी किंवा आचरणात आणली असायला हवी.
त्यासाठी हवी इच्छाशक्ती!
आम्ही त्या गोष्टी आचरणात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोतच !
चला तर आपणही या 10 गोष्टी आचरणात आणू या !

१. खेडी ओस पडत आहेत आणि शहरं बकाल होत आहेत त्यामुळे प्रत्येक समृद्ध जनाने आपल्या मूळ गावासाठी काहीतरी भरीव असे योगदान दिले पाहिजे आणि जे कायम शहरातच राहिले त्यांनी एखादे जिव्हाळ्याचे खेडे निवडून त्यासाठी काम केले पाहिजे. हाच आहे *समृद्ध जणांचा ध्यास, जिव्हाळ्याचा ग्रामविकास !*

२. आपल्याजवळ जी चल किंवा अचल संपत्ती (ज्यात वेळ, बुद्धी कौशल्य, पैसे, जमीन जुमला) गरजेपेक्षा जास्त आहे त्याचा गरजूंशी संपत्ती सहयोग करायला पाहिजे. सहयोगात आनंद मिळाला की त्यानंतर दान करण्याचा विचार करावा. यालाच *संपत्ती सहयोग ते संपत्तीदान* असे म्हणतात.

३. आपले जीवन उत्तमपणे जगा आणि आपले आईवडील, आद्य गुरुजी, कुटुंब, गाव आणि समाजासाठी उतराई होण्यासाठी मात्र नक्की जागा .
यालाच म्हणतात *जगा आणि जागा- समृध्दीतून सहयोग* !

४. आपल्या मुलांना घडविताना त्यांना त्यांच्या जीवनात उंच भरारी घेता येईल अश्या सर्व सोयी देण्याचा प्रयत्न करा. एकदाचे का ते आपल्या पायावर उभे राहिले आणि तुमच्यापेक्षा जास्त मिळवू लागले त्यावेळी आपली संपत्ती त्यांच्याच भरलेल्या रांजनात न टाकता आपल्या गरजेपुरते ठेवून त्या संपत्तीचा (ज्यात वेळ, बुद्धी कौशल्य, पैसे, जमीन जुमला) इतरांशी सहयोग करा.

५. आपल्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन टाळा. आपल्या गरजांना कमी किंवा मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करा. नाहक कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली की त्याचे दुष्परिणाम सुरू होतात. संपत्तीचा हव्यास देखील जीवनात आनंदापेक्षा अनेक दुखण्याला आमंत्रित करतो.

६ आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रातील असमर्थनिय, चुकीच्या, वाईट, अनैतिक गोष्टींचे समर्थन करू नका. अश्या प्रवृत्तीबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन त्या वेळीच थांबवता आल्या तर जरूर प्रयत्न करा.

७. विशेषतः सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांची भूमिका अतिशय पारदर्शी असावी.
समाज त्यांच्यापासून प्रेरणा घेत असतो. अश्यावेळी सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थानीं सातत्याने आपल्या भूमिकेशी कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक राहावे.

८. आजकाल सामाजिक क्षेत्रात काही अपवाद वगळता बऱ्याचश्या व्यक्ती / संस्थांची  समाजसेवा कामापेक्षा प्रेझेन्टेशन, रिपोर्ट यातच गुंतली आहे. कोणी उत्तम बोलबच्चन आहे तर कोणी अफलातून ड्रामेबाज आहे. कोणी वेदनेचा बाजार मांडला आहे तर कोणी भावनांचा सेतू उभारतो आहे. बहुतेक जण या ना त्या कारणाने दात्यांना भुरळ घालतो आहे. या अश्या प्रवृत्तींनी असे वागणे बंद करावे आणि समाजानेही अश्या प्रवृत्तीना फार खतपाणी मिळेल असे वागू नये.

९. हल्ली बऱ्याच सामाजिक संस्थांचा प्रवास त्यांचे संस्थान होण्याकडे जास्त आहे. समाजाचा पैसा वापरून आपल्या संस्थेच्या स्थावर मालमत्ता वाढवण्याकडे जास्त कल आहे. त्यापेक्षा समाजाचा पैसा ज्या सेवेसाठी संस्था उभारली आहे त्यासाठी केला तर फार कमी संसाधनात योग्य ती सेवा देता येईल. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात गरज नसताना आपल्या स्थावर मालमत्ता करणाऱ्या संस्थांकडे ( मग त्या लहान असो वा मोठ्या ) समाजाने चहुबाजूने  सातत्याने विचारणा करायला हवी. तेव्हाच समाजाचा पैसा नाहक वापरणाऱ्यांवर एक प्रकारचा वचक बसेल.

१०. बहुतेक संस्थाचालक सामाजिक क्षेत्रात चालणाऱ्या अनिष्ट किंवा चुकीच्या गोष्टींबाबत थेट व्यक्त होत नाहीत किंवा एखाद्या विषयावर आपली थेट भूमिका घेत नाही. भूमिका न घेतल्यामुळे वैयक्तिक ती व्यक्ती किंवा संस्था सर्वांच्या लेखी गुड बुक मध्ये असते. मात्र असे केल्याने समाजातील विकृती वाढतच जातात. अर्थातच योग्य ती भूमिका घेण्यासाठी आपण स्वतः योग्य पद्धतीने आपली वाटचाल केलेली असली पाहिजे ते देखील गरजेचे असते.

प्रत्येक जागरूक व्यक्ती/ संस्थानी आपल्या परीने वरील 10 गोष्टी आचरणात आणल्या तर नक्कीच बराचसा बदल घडून येईल. त्यासाठी  स्वतःच्या विचारांचे सीमोल्लंघन करणे गरजेचे आहे.

या विचाराशी सहमत असलेल्या व्यक्ती, संस्था, कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून एक चांगला समाज घडवू या !

वरील बाबतीत विस्ताराने समजून घेण्यासाठी *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा *दिवाळी अंक 2019*
*समाजाची नीतिमत्ता हरवतेय ?*
जरूर वाचा.

पुनश्च एकदा *विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा !*

आपलाच
*हरीश बुटले*
साद माणुसकीची
9422001560

Monday, 26 August 2019

सप्टेंबर 2019 चा अंक


अतिशय दर्जेदार आणि वाचनीय असा  *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा सप्टेंबरचा 2019 चा अंक *निसर्गाचा प्रकोप* प्रकाशित झाला. कोल्हापूर सांगलीच्या महापुराच्या आणि महापालक सन्मान सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाची माहिती असलेला अंक जरूर वाचा. अंकाची वार्षिक वर्गणी 700 रुपये असून वर्गणीदार होण्यासाठी खालील अकाउंटला रक्कम जमा करून आम्हाला  9823099663 या  क्रमांकावर whtasapp वर कळवा. 

SIR Foundation
Bank of Maharashtra 
Kesari wada, Narayan peth
Acc no. 60135365348
IFS Code MAHB0000154

You can shop online
www.sirfoundation.org.in

Friday, 16 December 2016

Wednesday, 7 December 2016

7 /12 हरीश बुटले

*सातबारा 7/12 वीस वर्षानंतरचा*
हरीश बुटले

आजचा दिवस माझ्या दृष्टीने फार महत्वाचा. रोहिणी आणि माझ्या सहजीवनाचा 20 वर्षाचा कालखंड डोळ्यासमोरून फ्लॅशबॅकच्या स्वरूपात तरळताना तो टप्पा कसा गाठला गेला काही कळलेच नाही. सततच्या कार्यमग्नतेत 20 वर्षातील 7300 दिवस आयुष्याच्या या सातबाऱ्यावर काही ना काही आनंदाच्या खुणा कोरून गेलीत. 

*श्रद्धा क्लासेस, श्रद्धा पब्लिकेशन, डीपर, सर फाउंडेशन, तुम्ही आम्ही पालक मासिक, साद माणुसकीची* ही वाटचाल मागील वीस वर्षाची साक्षी आहे. लग्नापूर्वीची श्रद्धा कलासेस आणि पब्लिकेशन ही जीवनातील चढ उताराची आणि स्थैर्याची तर मागील 10-12 वर्षाची डीपर पासून सुरु झालेली सामाजीकतेची वाटचाल जीवनाला एक वेगळा आयाम देऊन गेली. या दरम्यान जे सामाजिक भान निर्माण झालं आहे त्याची परिणीती आज साद माणुसकीच्या सामाजिक अभियानात झाली. 

या 20 वर्षातील प्रवासात मिळालेली रोहिणीची साथ खरंच उल्लेखनीय आहे. सुरवातीच्या काही दिवसात माझे सामाजिक भान तिला झेपत नव्हते पण डीपरच्या सुरवातीनंतर जशी जशी पुढे सर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु झालेला *महापालक सन्मान, तुम्ही आम्ही पालक मासिक* आणि त्यातून उभं राहिलेलं *साद माणुसकीची सामाजिक अभियान* जसं जसं पुढे आलं तिची सामाजिक जाणीव दिवसेंदिवस प्रगल्भ होत गेली. त्यामुळेच मला एकाचवेळी अनेक आघाड्यांवर कार्यरत राहता आलं. तिने स्वतःची हॉस्पिटलमधील CMO ची व्यस्त नोकरी सांभाळून आमच्या मुलांना *श्रद्धा आणि हर्ष*दोघांनाही भरपूर वेळ देऊन ज्या पद्धतीने संगोपन केले ते खरंच कौतूकास्पद आणि अभिमानास्पद आहे. घरातून सपोर्ट मिळाला की माणूस काय करू शकतो ते मी अनुभवलं आहे. म्हणूनच मी माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तेवढेच समर्थपणे भिडत असतो आणि आमच्या कार्याला नवनवीन आयाम देत असतो. माझ्या या वाटचालीत  डॉ रोहिणीचा खूपच मोलाचा वाटा आहे. तिच्या सहकार्याने 20 वर्षाचा कालावधी कसा निघून गेला ते कळले देखील नाही. 

जे करावे ते उत्तम आणि ज्यात हात घालू त्यात निष्ठेने आणि सचोटीने झोकून द्यायची वृत्ती असल्याने माझ्या प्रत्येक कामाला एका विशिष्ट उंची लाभली. त्या त्या क्षेत्रातील ते उत्तम काम ठरले. डीपरने गुणवत्तेचे सारे आयाम सर केले. आज महाराष्ट्रात डीपरसारखी दुसरी परीक्षा नाही आणि प्रयत्न करूनही तिच्या आसपास कोणी पोहोचू शकलं नाही. 10 वर्षात सात वेळा डीपरची परीक्षा देणारे विद्यार्थी राज्यात पहिले आणि त्यात 3 वेळा वैद्यकीय आणि इंजिनीरिंग दोन्हीसाठी हे स्वप्नवत वाटतं पण वास्तवात उतरले आहे. 4500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेने MBBS ची कवाडं उघडण्यासाठी आत्मविश्वास दिला. खरंतर मलाच डॉक्टर होण्याची मोठी इच्छा होती मात्र माझ्या जबाबदाऱ्या मला खुणावत होत्या त्यामुळे मला COEP ला  इंजिनीरिंगला जावं लागलं. अर्थात डॉ रोहिणीच्या माझ्या आयुष्यात येण्याने ती पोकळी भरून निघाली.  

*तुम्ही आम्ही पालक*मासिकामुळे माझ्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. महापालक सन्मानाच्या निमित्याने सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास लाभला. *डॉ प्रकाश आमटे काका आणि डॉ मंदा काकूंच्या* एका तपानंतरच्या हेमलकसा येथील भेटीने माझ्या मनाच्या कोपऱ्यातील सामाजिक जाणिवेला एक सकारात्मक आणि विधायक वळण मिळालं. पुढील 2-3 वर्षात माझ्या जाणीवा प्रगल्भ होत गेल्या आणि मी सामाजिक क्षेत्राकडे खूपच विचारपूर्वक बघू लागलो आणि मनस्वी चिंतन करू लागलो. त्याच दरम्यान *डॉ रवींद्र कोल्हे आणि डॉ स्मिताताई* यांच्याकडे बैरागडला जाण्याचे भाग्य मिळाले. त्यांच्या सहवासात समर्पणाची परिसीमा काय असू शकते आणि साधेपणा व गरजेपुरते काय आणि कसे असावे याची शिकवण मिळाली. त्यांनाही माझे काम खूप भावले. आता तर रवीदादा साद माणुसकीची फाउंडेशनचे संचालक आहेत. *डॉ कुमार सप्तर्षी आणि डॉ उर्मिलादिदीं*कडूनही खूप स्नेह मिळाला. डॉक्टरांच्याजवळ विचारांची आणि त्यांच्या अनुभवाची काही कमीच नाही. ते म्हणजे ज्ञानाचं
समृद्ध भांडरच होय. या तिन्ही महापालकांना आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण स्थान आहे. 

यादरम्यानच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांच्या कामं करण्याच्या पद्धती या साऱ्याच बाबी जवळून बघता आल्या आणि समजूनही घेता आल्या. विविध ग्रुप्स त्यावरील चर्चा, वास्तववादी कामं आणि आभासी कामं याचा अंदाजही येऊ लागला. त्यातूनच काहीतरी भरीव करू शकू या संदर्भात विचार सुरु झाले आणि *साद माणुसकीची सामाजीकता अभियानाची* मुहूर्तमेढ रोवली. 

माझ्या जीवनाचा महत्वाचा धर्म म्हणजे *मूळ कधीही न विसरणे ,ज्याचं श्रेय त्याला देणं आणि इतरांना काहीही सांगण्यापूर्वी स्वतः कृती करणे*. जन्मदात्या आई-वडिलांपासून तर माझ्या जीवनात आलेले माझे प्रमुख शिक्षक आजही मला तेवढेच भावतात आणि त्यांच्या आठवणीशिवाय माझ्या जीवनातील कोणतीही महत्वाची गोष्ट पूर्ण होत नाही. या वर्षी विलक्षण योगायोग आहे. माझे *आई दादा* त्यांच्या लग्नाचे 50 वर्ष पूर्ण करत आहेत तर माझे *आद्य गुरुजी श्री घुलारामजी टोंगे*वयाची 75 पूर्ण करत आहेत. पुण्यात *प्रा सुरेश रहाळकर सर* 75 च्या उंबरठ्यावर आहेत आणि आज आमच्या सहजीवनाचे 20 वर्षे पूर्ण होत आहेत. 
आमच्या या वाटचालीत आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची, जिवाभावाच्या मित्रांची साथ मोलाची ठरली. माझ्या प्रत्येक कामात काही जणांनी फारच मोलाचे सहकार्य केले. माझ्या प्रत्येक कामाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राहीलं आहे . त्यामुळे कामाला सुरुवात करताना माझ्या धडपडीला बघून पुढाकाराला कोणी ना कोणी पुढे आले आणि त्यातून ही वाटचाल सुकर होत गेली. या प्रत्येकाचे आम्ही कायमस्वरूपी ऋणी आहोत. 

माझ्या मते *चांगल्या वृत्तीचे शिक्षकच उत्तम पिढी घडवू शकतात* त्यामुळे शिक्षकांना समृद्ध कसे करता येईल त्यासाठी माझा विशेष प्रयत्न सुरु आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने समृद्ध झाल्यानंतर आपल्या मूळ गावाकडे वळून बघितलं आणि आपल्या *समृद्धीतून सहयोग* केला  तर गावोगावच्या शिक्षण ,आरोग्याच्या, रोजगाराच्या, वृद्धांच्या समस्या दूर होण्यास वेळ लागणार नाही मात्र बहुतांशी लोकं आपल्या गावासाठी म्हणावा तसा सहयोग करत नाहीत. त्यासाठी कारणेही अनेक आहे. ही स्थिती जाणून आता *जगा आणि जागा समृद्धीतून सहयोग* या अभियानातून जागरण करायचे ठरविले आहे.

माझ्या कामाची एक पद्धत आहे ती म्हणज आधी स्वतः करायचे आणि त्यानंतरच इतरांना सांगायचेे. *संपत्तीसहयोग ते संपत्तीदान* या संकल्पनेची सुरुवात तुम्ही आम्ही पालक या मासिकाला *समाजाला समर्पित* करून केलेली आहे. हे मासिक सुजाण पालकत्व , शिक्षण आणि सामाजिक कारणासाठी असून त्यात अजूनतरी कोणतीही जाहिरात स्वीकारली जात नाही.  या मासिकाच्या निर्मितीचा खर्च वगळता नवा पैसा आम्ही संस्थेसाठी किंवा वैयक्तिक वापरत नाही. त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त असलेल्या बाबींचा सहयोग करण्यासाठी मी माझा पुण्यातील फ्लॅट ज्याची बाजारातील किंमत किमान 70 लाख असेल तो संपत्तीसहयोगातून सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी *तात्पुरता निवारा* म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे *जगा आणि जागा*समृद्धीतून सहयोग या संकल्पनेची माझ्या मूळ गावाला कोठारीला 5 लाखाची मदत पुढील पाच वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे देण्याचे योजले आहे आणि त्याची सुरुवातही केलेली आहे. 

आजपर्यंतच्या वाटचालीत सामाजिक क्षेत्रात जेवढ काम करणं शक्य झालं ते स्वावलंबनातूनच केलं. बाहेरील देणगी किंवा कोणताही सरकारी अनुदान अपेक्षित केलं नाही. मात्र आता साद माणुसकीची फाउंडेशनसाठी पहिला मोठा सहयोग तब्बल 20 लाख रुपयांचा *विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट* कडून मिळाला आहे. ही सर्व रक्कम माझे मूळ गाव कोठारीच्या शेजारील 10 शाळांच्या सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. *साद माणुसकीची फाउंडेशन* हे पुढील 3 ते 5 वर्षात या महाराष्ट्रातील एक आघाडीची सामाजिक संस्था जी केवळ इतरांसाठी काम करणारी संस्था म्हणून प्रस्थापित होईल यात मला तिळमात्र शंका नाही. 

या सर्व वाटचालीत मला माझ्या मुलांचे खूपच कौतुक आहे.  त्यांच्या जाणीवा फार प्रगल्भ आहे. त्यांना कल्पना आहे की ते कर्ते झाल्यानंतर आमच्या संपत्तीत त्यांना वाटा नाही. जे काही शेवटी शिल्लक राहील ते समाजासाठी आहे. 
आम्ही दोघेही 2025 ला आमच्या कामातून विराम घेऊन आमच्या आनंदासाठी, ज्या ठिकाणी आम्हाला योगदान देता येईल अश्या ठिकाणी, वास्तव्यास जाणार आहोत. हे सारं आम्ही महामानव बाबा आमटे यांच्या शताब्दी सोहळ्याच्या वेळी काढलेल्या विशेष अंकात आमच्या वचननाम्याच्या स्वरूपात मांडलेले आहेच. 

असा आहे *आमचा सातबारा या 20 वर्षाचा*. दरवर्षी नवीन एका उर्मीने आजचा दिवस साजरा करत वाटचाल सुरु आहे आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी...

*हरीश व डॉ रोहिणी बुटले*
साद माणुसकीची
9422001560

Friday, 2 December 2016

जगा आणि जागा

फ्रेश बातमी साठी

साद माणुसकीची सामाजिकता अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी केंद्राच्या कार्यकक्षेत येणाऱ्या 10 शाळा साठी *विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट* यांचेकडून 20 लाख रु. सहयोग निधी उद्या मुंबईत होणाऱ्या *जगा आणि जागा समृध्दीतून सहयोग* या कार्यक्रमात हस्तांतरण करण्यात येणार असल्याची माहिती साद माणुसकीचे संकल्पक हरीश बुटले यांनी दिली.

अधिक माहिती कार्यक्रमाची रूपरेषा पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Friday, 25 November 2016

तुम्ही आम्ही पालक नोव्हेंबर 2016 अंक

समाजाला समर्पित, विनाजाहिरातीचे, बहुरंगी आणि जागरूक पालकत्वाला वाहिलेल्या अतिशय दर्जेदार अश्या *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा *डिसेंबर 2016 अंक*
*पाल्याचे करिअर - स्वप्न की स्वप्नांचे ओझे* प्रसिद्ध झाला.

*अंकाचे मूल्य 70 रुपये*

*मासिकाची वार्षिक वर्गणी ₹700*

आपण अजून मासिकाचे सभासद झाला नसाल तर आपण ऑनलाईन (online) पद्धतीने
*www.sirfoundation.org.in* वर नोंदणी करू शकता किंवा आपली वर्गणी रोख/ चेक/ डीडी ने थेट
*SIR FOUNDATION*,
Bank of Maharashtra Narayanpeth शाखा ,
*A/c no. 60135365348*
IFSC MAHB0000154
या खात्यावर भरू शकता.

*पत्रव्यवहाराचा पत्ता*

*तुम्ही आम्ही पालक* मासिक
*सर फाऊंडेशन*
२०१, बाळकृष्ण अपार्टमेंट,
गजानन चैतन्य बिल्डिंगच्या आत,
पत्र्या मारुती मंदिराजवळ,
नारायण पेठ, पुणे 411030

आपणांस अधिक माहिती हवी असल्यास
*(24 ×7)हेल्पलाईन*
*73040 55000*

*ऑफिस* (सकाळी 10.30 ते सायं 6.30) *8605009232*
020 24465885/24457781
या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
info@sirfoundation.org.in

आपण सभासद व्हा आणि इतरांनाही ही माहिती पाठवून प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे सामाजिक कार्यात आपला वाटा उचलू शकता.

पुढील अंक जानेवारी 2017
*सामाजिक कार्य - वास्तव आणि आभास*

अंकात लेख लिहायचे असल्यास, काही सूचना किंवा भरीव योगदान द्यायचे असल्यास आपण
थेट संपर्क साधू शकता.

*हरीश बुटले*
संपादक
9422001560
hariahbutle@gmail.com