*चला करू या कृतिशील सीमोल्लंघन आपल्या विचारांचे*!
*सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !*
आज विजयादशमी !
वाईट विचार आणि आचाराला मूठमाती देत आपल्या चांगल्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी सीमोल्लंघन करण्याचा मुहूर्त !
समाजात काही महत्त्वाच्या समस्या आहेत. त्या समस्यांना आपल्या विचारसरणीत योग्य बदल आणून आपण सगळे मिळून नक्कीच सोडवू शकतो. अर्थातच कोणतीही गोष्ट इतरांनी करावी असे वाटत असेल तर त्याप्रमाणे आपण स्वतः कृती करायला हवी किंवा आचरणात आणली असायला हवी.
त्यासाठी हवी इच्छाशक्ती!
आम्ही त्या गोष्टी आचरणात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोतच !
चला तर आपणही या 10 गोष्टी आचरणात आणू या !
१. खेडी ओस पडत आहेत आणि शहरं बकाल होत आहेत त्यामुळे प्रत्येक समृद्ध जनाने आपल्या मूळ गावासाठी काहीतरी भरीव असे योगदान दिले पाहिजे आणि जे कायम शहरातच राहिले त्यांनी एखादे जिव्हाळ्याचे खेडे निवडून त्यासाठी काम केले पाहिजे. हाच आहे *समृद्ध जणांचा ध्यास, जिव्हाळ्याचा ग्रामविकास !*
२. आपल्याजवळ जी चल किंवा अचल संपत्ती (ज्यात वेळ, बुद्धी कौशल्य, पैसे, जमीन जुमला) गरजेपेक्षा जास्त आहे त्याचा गरजूंशी संपत्ती सहयोग करायला पाहिजे. सहयोगात आनंद मिळाला की त्यानंतर दान करण्याचा विचार करावा. यालाच *संपत्ती सहयोग ते संपत्तीदान* असे म्हणतात.
३. आपले जीवन उत्तमपणे जगा आणि आपले आईवडील, आद्य गुरुजी, कुटुंब, गाव आणि समाजासाठी उतराई होण्यासाठी मात्र नक्की जागा .
यालाच म्हणतात *जगा आणि जागा- समृध्दीतून सहयोग* !
४. आपल्या मुलांना घडविताना त्यांना त्यांच्या जीवनात उंच भरारी घेता येईल अश्या सर्व सोयी देण्याचा प्रयत्न करा. एकदाचे का ते आपल्या पायावर उभे राहिले आणि तुमच्यापेक्षा जास्त मिळवू लागले त्यावेळी आपली संपत्ती त्यांच्याच भरलेल्या रांजनात न टाकता आपल्या गरजेपुरते ठेवून त्या संपत्तीचा (ज्यात वेळ, बुद्धी कौशल्य, पैसे, जमीन जुमला) इतरांशी सहयोग करा.
५. आपल्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन टाळा. आपल्या गरजांना कमी किंवा मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करा. नाहक कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली की त्याचे दुष्परिणाम सुरू होतात. संपत्तीचा हव्यास देखील जीवनात आनंदापेक्षा अनेक दुखण्याला आमंत्रित करतो.
६ आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रातील असमर्थनिय, चुकीच्या, वाईट, अनैतिक गोष्टींचे समर्थन करू नका. अश्या प्रवृत्तीबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन त्या वेळीच थांबवता आल्या तर जरूर प्रयत्न करा.
७. विशेषतः सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांची भूमिका अतिशय पारदर्शी असावी.
समाज त्यांच्यापासून प्रेरणा घेत असतो. अश्यावेळी सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थानीं सातत्याने आपल्या भूमिकेशी कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक राहावे.
८. आजकाल सामाजिक क्षेत्रात काही अपवाद वगळता बऱ्याचश्या व्यक्ती / संस्थांची समाजसेवा कामापेक्षा प्रेझेन्टेशन, रिपोर्ट यातच गुंतली आहे. कोणी उत्तम बोलबच्चन आहे तर कोणी अफलातून ड्रामेबाज आहे. कोणी वेदनेचा बाजार मांडला आहे तर कोणी भावनांचा सेतू उभारतो आहे. बहुतेक जण या ना त्या कारणाने दात्यांना भुरळ घालतो आहे. या अश्या प्रवृत्तींनी असे वागणे बंद करावे आणि समाजानेही अश्या प्रवृत्तीना फार खतपाणी मिळेल असे वागू नये.
९. हल्ली बऱ्याच सामाजिक संस्थांचा प्रवास त्यांचे संस्थान होण्याकडे जास्त आहे. समाजाचा पैसा वापरून आपल्या संस्थेच्या स्थावर मालमत्ता वाढवण्याकडे जास्त कल आहे. त्यापेक्षा समाजाचा पैसा ज्या सेवेसाठी संस्था उभारली आहे त्यासाठी केला तर फार कमी संसाधनात योग्य ती सेवा देता येईल. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात गरज नसताना आपल्या स्थावर मालमत्ता करणाऱ्या संस्थांकडे ( मग त्या लहान असो वा मोठ्या ) समाजाने चहुबाजूने सातत्याने विचारणा करायला हवी. तेव्हाच समाजाचा पैसा नाहक वापरणाऱ्यांवर एक प्रकारचा वचक बसेल.
१०. बहुतेक संस्थाचालक सामाजिक क्षेत्रात चालणाऱ्या अनिष्ट किंवा चुकीच्या गोष्टींबाबत थेट व्यक्त होत नाहीत किंवा एखाद्या विषयावर आपली थेट भूमिका घेत नाही. भूमिका न घेतल्यामुळे वैयक्तिक ती व्यक्ती किंवा संस्था सर्वांच्या लेखी गुड बुक मध्ये असते. मात्र असे केल्याने समाजातील विकृती वाढतच जातात. अर्थातच योग्य ती भूमिका घेण्यासाठी आपण स्वतः योग्य पद्धतीने आपली वाटचाल केलेली असली पाहिजे ते देखील गरजेचे असते.
प्रत्येक जागरूक व्यक्ती/ संस्थानी आपल्या परीने वरील 10 गोष्टी आचरणात आणल्या तर नक्कीच बराचसा बदल घडून येईल. त्यासाठी स्वतःच्या विचारांचे सीमोल्लंघन करणे गरजेचे आहे.
या विचाराशी सहमत असलेल्या व्यक्ती, संस्था, कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून एक चांगला समाज घडवू या !
वरील बाबतीत विस्ताराने समजून घेण्यासाठी *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा *दिवाळी अंक 2019*
*समाजाची नीतिमत्ता हरवतेय ?*
जरूर वाचा.
पुनश्च एकदा *विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा !*
आपलाच
*हरीश बुटले*
साद माणुसकीची
9422001560
